केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड! सोशल मीडिया पोस्टमुळे महिला डॉक्टरवर कठोर कारवाई..


पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एका महिला डॉक्टरवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन (AIDSA) ने डॉ. मुस्कान सोनी यांना तब्बल पाच वर्षांसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केतन अग्रवाल यांच्या मृत्यूबाबत डॉ. मुस्कान सोनी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर वादग्रस्त स्टोरी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये हसणाऱ्या इमोजींसह मृत्यूची थट्टा करणारा मजकूर असल्याचा आरोप करण्यात आला. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत AIDSA ने संबंधित कृत्य वैद्यकीय व्यवसायाच्या नैतिक मूल्यांच्या विरोधात असल्याचे नमूद केले. डॉक्टरांकडून समाजाप्रती संवेदनशील आणि जबाबदार वर्तन अपेक्षित असताना अशा प्रकारचे वर्तन अस्वीकार्य असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

संस्थेने जारी केलेल्या आदेशानुसार, डॉ. मुस्कान सोनी यांना पुढील पाच वर्षांसाठी ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. या कालावधीत त्यांना संस्थेचे कोणतेही पद धारण करता येणार नाही. तसेच सदस्यत्वाचे अधिकार, अधिकृत बैठका, परिसंवाद आणि इतर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय, पुढील पाच वर्षांत संस्थेअंतर्गत होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यासही त्यांना मनाई करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या असंवेदनशील वर्तनाला आळा घालण्यासाठी आणि समाजात योग्य संदेश देण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!