लोणी स्टेशनवर पोलिसांचा अंमली पदार्थ तस्करांला दणका; ६०८ ग्रॅम गांजासह आरोपी जेरबंद..


लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी धडक कारवाई करत ६०८ ग्रॅम गांजासह एका तस्कराला जेरबंद केले आहे.

मंगळवारी (ता. ३०) रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारांस करण्यात आलेल्या या कारवाईत ३६ हजार रुपयांचा गांजा आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अमिरखान सुदाखान पठाण (वय ५०, रा. विश्वराज हॉस्पिटल शेजारी, लोणी स्टेशनजवळ, कदमवाकवस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई अशोक भागवत गिरी यांनी सरकारतर्फे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वराज हॉस्पिटलसमोरील लोणी रेल्वे स्टेशन परिसरात अमिरखान पठाण हा संशयास्पदरीत्या फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. झडतीदरम्यान आरोपीकडे विक्रीसाठी बेकायदेशीररीत्या ठेवलेला ६०८ ग्रॅम गांजा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(अ) अन्वये लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के करीत असून, अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील अशा कारवाया भविष्यातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!