केतन अग्रवाल प्रकरणावर ‘तो’ व्हिडीओ पडला महागात! महिला डॉक्टरवर 5 वर्षांची मोठी कारवाई, सर्व पदेही काढून घेतली

पुणे : पुण्यातील बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करून व्हिडीओ पोस्ट करणे एका महिला दंतचिकित्सकाला चांगलेच महागात पडले आहे. डॉ. मुस्कान सोनी यांच्यावर *ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन असोसिएशन*ने तब्बल पाच वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर देशभरातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
असोसिएशनने जारी केलेल्या निवेदनात डॉ. सोनी यांनी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूबाबत केलेली टिप्पणी असंवेदनशील, आक्षेपार्ह आणि संस्थेच्या नैतिक मूल्यांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. या वक्तव्यामुळे संस्थेच्या आचारसंहितेचा भंग झाल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. विशेष म्हणजे, जुलै 2025 मध्ये त्यांची असोसिएशनच्या खजिनदारपदी नियुक्ती झाली होती.

निलंबनानंतर पुढील पाच वर्षांसाठी त्यांचे सदस्यत्व, खजिनदारपद, समितीतील सहभाग आणि संस्थेशी संबंधित सर्व अधिकार रद्द करण्यात आले आहेत. तसेच या कालावधीत त्यांना असोसिएशनच्या कोणत्याही बैठकीत, कार्यक्रमात किंवा अधिकृत उपक्रमात सहभागी होता येणार नाही. संबंधित विभागाकडून निलंबन मागे घेतल्याशिवाय त्यांना कोणतीही जबाबदारी दिली जाणार नसल्याचेही असोसिएशनने स्पष्ट केले आहे.


दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, 18 जून रोजी लोणावळ्याजवळील लोहगड किल्ल्यावर सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल यांना कड्यावरून ढकलून हत्या केल्याचा आरोप आहे. या दोन्ही आरोपींना 23 जून रोजी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी 3 जुलैपर्यंत वाढवली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावरील जबाबदारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक नैतिकतेबाबत पुन्हा एकदा मोठी चर्चा रंगली आहे.
