महत्त्वाची बातमी! 6 दिवस मंगल कार्यालयांतील विवाह सोहळ्यांना बंदी; पोलिसांकडून कडक सूचना

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ४ ते ९ जुलै २०२६ या कालावधीत आळंदी शहरातील सर्व मंगल कार्यालये आणि धर्मशाळांमध्ये विवाह, साखरपुडा तसेच इतर मोठ्या कौटुंबिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीत दाखल होणार असल्याने भाविकांची सुरक्षा, वाहतूक व्यवस्था आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. आळंदी पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी यासंदर्भातील सूचना दिल्या.
याशिवाय, पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील नवीन बांधकामांवरही तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तसेच जुन्या व धोकादायक इमारती असलेल्या धर्मशाळांमध्ये वारकऱ्यांचा मुक्काम ठेवू नये, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

प्रशासनाने धर्मशाळा व मंगल कार्यालयांसाठीही काही नियम बंधनकारक केले आहेत. महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र निवास व स्नानगृहांची व्यवस्था, २४ तास कार्यरत सीसीटीव्ही यंत्रणा, संशयास्पद हालचालींची तात्काळ पोलिसांना माहिती आणि वारकऱ्यांना केवळ ताजे व दर्जेदार अन्न देणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दरम्यान, ज्यांचे विवाह किंवा इतर कार्यक्रम आधीच निश्चित झाले आहेत, त्यांनी संबंधित कागदपत्रे आणि तारखांची पडताळणी करूनच पुढील निर्णय घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.