महाराष्ट्रात पहिलाच प्रयोग! पुणे जिल्ह्यात पंचायत समिती सभापतींच्या असोसिएशनची स्थापना..

पुणे : आपल्या विविध मागण्या, अधिकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रश्नांसाठी पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय पंचायत समिती सभापती एकत्र आले आहेत. यासाठी सर्व सभापतींनी मिळून ‘पुणे जिल्हा पंचायत समिती सभापती असोसिएशन’ची स्थापना केली असून, अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग ठरला आहे.

महाराष्ट्रात पहिल्यांदाच स्थापन करण्यात आलेल्या या असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी आंबेगाव पंचायत समितीचे सभापती कैलास काळे, उपाध्यक्षपदी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, तर सचिवपदी बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती सभापतींची नुकतीच पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते असोसिएशनची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. बैठकीत जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या विविध समस्या, अधिकार आणि विकासकामांबाबत सविस्तर चर्चा झाली.

यानंतर असोसिएशनच्या वतीने पंचायत समिती सभापतींच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांना देण्यात आले.

यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास काळे आणि उपाध्यक्ष युवराज काकडे यांनी पंचायत समित्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी आणि समस्यांबाबत माहिती दिली. तालुकास्तरावरील विकासकामांसाठी आवश्यक निधी, अधिकार तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा आणि राज्य पातळीवर प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचेही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे, शिरूरच्या सभापती स्वाती घावटे, मावळच्या सभापती सुनीता येवले, भोरच्या सभापती मनीषा कंक, मुळशीच्या सभापती मंदा शेळके, राजगड (वेल्हे)च्या सभापती सुवर्णा राऊत, खेडच्या सभापती विद्या मोहिते, इंदापूरचे सभापती हर्षवर्धन लोंढे, पुरंदरचे सभापती अमित झेंडे आदी उपस्थित होते. बारामतीचे सभापती किरण तावरे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले.