TET पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय! परीक्षा पद्धतीत होणार मोठे बदल; तपासासाठी SIT, आरोपींवर ‘मकोका’चीही शक्यता

मुंबई : महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटी प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाल्यानंतर राज्य सरकारने परीक्षा प्रक्रियेत व्यापक बदल करण्याचे संकेत दिले आहेत. भविष्यात पेपरफुटीसारख्या घटना रोखण्यासाठी टीईटीसह महत्त्वाच्या भरती आणि पात्रता परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा पर्याय गांभीर्याने विचाराधीन असून, त्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे.

विधानसभेत या प्रकरणावर माहिती देताना मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की, या रॅकेटचा तपास केवळ राज्यापुरता मर्यादित नसून अनेक राज्यांपर्यंत त्याचे धागेदोरे पोहोचल्याचा संशय आहे. त्यामुळे तपास अधिक प्रभावी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) कार्यरत करण्यात आले असून संपूर्ण नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्रश्नपत्रिकांचे संच, मोबाईल, आर्थिक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत. प्राथमिक चौकशीत मोठ्या रकमेचा व्यवहार होणार असल्याचे संकेत मिळाल्याने आर्थिक तपासालाही गती देण्यात आली आहे. दरम्यान, या रॅकेटशी संबंधित काही संशयित अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

सरकारकडून या प्रकरणाकडे संघटित गुन्हेगारीच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. त्यामुळे आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) लागू करता येईल का, याची कायदेशीर पडताळणी सुरू असल्याची माहितीही देण्यात आली. पुरावे आणि तपासाच्या निष्कर्षानुसार पुढील कठोर कारवाई केली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, भविष्यात परीक्षा प्रक्रियेत तांत्रिक सुरक्षा वाढवणे, प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेसाठी नवीन यंत्रणा उभारणे आणि ऑनलाईन परीक्षांचा टप्प्याटप्प्याने विस्तार करणे, या उपाययोजनांवर समिती शिफारसी करणार आहे. या प्रकरणानंतर राज्यातील परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.