‘अर्थखातं आमच्याच वाट्याला येणार’; जय पवारांचा मोठा दावा, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेचा केला खुलासा


बारामती : दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या सत्ताकारणात अनेक बदल घडले. त्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेले अर्थखाते अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. मात्र आता हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता असल्याचे संकेत पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी दिले आहेत. बारामतीतील एका कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

बारामती येथे दिवंगत अजित पवार यांच्या सहवासात काम केलेल्या आजी-माजी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांसाठी आयोजित कृतज्ञता स्नेहमेळाव्यात जय पवार बोलत होते. या वेळी त्यांनी अजित पवार यांच्या कार्याची आठवण करून देताना त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केले.

जय पवार म्हणाले की, अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखात्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. त्यामुळे काहींना विकासकामांवर परिणाम होईल, अशी भीती होती. मात्र राज्यातील विकासकामे थांबलेली नाहीत आणि सरकारकडून ती नियमितपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याचवेळी त्यांनी मोठा दावा करत सांगितले की, अर्थखात्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. लवकरच हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येईल, अशी अपेक्षा असून त्याबाबत अनुकूल वातावरण असल्याचेही त्यांनी सूचित केले. राज्यातील नागरिकांना या विषयाची चिंता असली तरी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि कुटुंबीयांना त्याहून अधिक काळजी असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात बोलताना जय पवार यांनी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मिळालेल्या मोठ्या जनसमर्थनाबद्दल मतदारांचे आभार मानले. तसेच दिवंगत अजित पवार यांचे स्मारक बारामती येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती देत त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

जय पवार यांच्या या विधानामुळे राज्य मंत्रिमंडळात फेरबदल होणार का, अर्थखात्याची धुरा पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार का आणि त्याची जबाबदारी नेमकी कोणाकडे सोपवली जाणार, याबाबतच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे. आता सरकारकडून होणाऱ्या पुढील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!