PM किसानचा हप्ता आला, पण खात्यात जमा झाला फक्त 1 पैसा! 2 हजारांऐवजी 1 पैशाचा मेसेज; सिस्टीमचा घोळ की मोठी चूक?

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये जमा केले जातात. मात्र, भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा गावात या योजनेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पात्र शेतकऱ्याच्या खात्यात दोन हजार रुपयांच्या हप्त्याऐवजी अवघा 1 पैसा (₹0.01) जमा झाल्याचा संदेश मोबाईलवर आल्याने खळबळ उडाली आहे.

हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्याला बँकेकडून पैसे जमा झाल्याचा संदेश आला. मात्र, संदेश उघडताच खात्यात ₹2,000 ऐवजी केवळ ₹0.01 जमा झाल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहून शेतकरी आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला.
कर्जाचा बोजा, बियाण्यांचा खर्च आणि पावसाची अनिश्चितता अशा अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा प्रकार संतापजनक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. संबंधित शेतकऱ्याने, “आम्ही हप्त्याची वाट पाहतो आणि खात्यात एक पैसा जमा होतो. ही आमची थट्टा नाही तर काय?” असा सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान, हा प्रकार बँकिंग प्रणालीतील तांत्रिक बिघाडामुळे घडला की प्रशासकीय निष्काळजीपणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
