मोदींच्या ‘मिशन 2029’ची तयारी सुरू? महाराष्ट्राला मोठा वाटा मिळणार; अनेक मंत्र्यांची सुट्टी, नव्या चेहऱ्यांची वर्णी लागण्याची चर्चा

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारमध्ये लवकरच मोठा मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि 2029 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप नेतृत्वाने नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू केल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अलीकडील बैठकींनंतर या चर्चांना अधिक वेग आला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही केंद्रीय मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला असून त्यानुसार मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध वादांमुळे त्यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असल्याने त्यांच्या खात्यात बदल किंवा मंत्रिमंडळातून वगळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्याबाबतही अशीच चर्चा असून त्यांना संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
या फेरबदलात नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळू शकते. महाराष्ट्रातील महायुतीचे राजकीय संतुलन मजबूत करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे नावही चर्चेत असून त्यांना महत्त्वाची आर्थिक जबाबदारी दिली जाऊ शकते. भाजप खासदार आणि लोकप्रिय अभिनेते अरुण गोविल यांच्याही नावाची चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काही विद्यमान राज्यमंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता असून अनुराग ठाकूर यांच्यासह काही नेत्यांना अधिक मोठी भूमिका दिली जाऊ शकते. याशिवाय अनेक मंत्रालयांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. विशेषतः अर्थ, शिक्षण, पेट्रोलियम, उड्डयन, संरक्षण आणि गृहनिर्माण यांसारख्या महत्त्वाच्या मंत्रालयांमध्ये फेरबदल होऊ शकतात.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या खात्याबाबतही चर्चा सुरू असून काही सूत्रांच्या दाव्यानुसार अर्थ खात्याची जबाबदारी दुसऱ्या चेहऱ्याकडे जाऊ शकते, तर त्यांना अन्य महत्त्वाचे मंत्रालय दिले जाऊ शकते. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राजकीय विश्लेषकांच्या मते, ओडिशा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांना मंत्रिमंडळ विस्तारात अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. प्रादेशिक आणि सामाजिक समीकरणे साधत भाजप आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक ताकद वाढवण्याच्या तयारीत असल्याचे या हालचालींवरून दिसून येत आहे. मात्र फेरबदलाबाबतचा अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.