प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती संभाजीनगर-गोवा आणि हैदराबादच्या दुपारच्या विमानसेवा 3 महिन्यांसाठी बंद; जाणून घ्या कारण


छत्रपती संभाजीनगर : अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर परिणाम होऊ लागला असून त्याचा फटका आता छत्रपती संभाजीनगरच्या विमानसेवेलाही बसला आहे. इंडिगो एअरलाईन्सने 1 जुलै ते 30 सप्टेंबर या पावसाळी वेळापत्रकात बदल करत गोवा आणि हैदराबादच्या दुपारच्या नियमित विमानसेवा पुढील तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगरहून दररोज होणाऱ्या विमान उड्डाणांची संख्या 9 वरून 7 वर आली आहे. मात्र, एअर इंडियाच्या नवी दिल्लीसाठीच्या सकाळ आणि दुपारच्या दोन्ही नियमित विमानसेवा पूर्ववत सुरू राहणार असल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्यात इंडिगोने 24 ऑक्टोबर 2026 पर्यंतचे उन्हाळी वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने बदल करण्यात आले. सुरुवातीला मुंबईच्या काही सेवांमध्ये बदल करून नवी मुंबई मार्ग सुरू करण्यात आला. आता गोवा आणि हैदराबादच्या दुपारच्या फेऱ्यांनाही तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याशिवाय बेंगळुरूच्या आठवड्यातील चार दिवसांच्या विमानसेवेतील एका दिवसाचीही कपात करण्यात आली आहे.

दरम्यान, हैदराबादहून छत्रपती संभाजीनगरला येणाऱ्या सकाळच्या विमानाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. यापूर्वी हे विमान सकाळी 8.30 वाजता चिकलठाणा विमानतळावर पोहोचत होते. नव्या वेळापत्रकानुसार ते आता सकाळी 8.10 वाजता, म्हणजेच तब्बल 20 मिनिटे आधी दाखल होणार आहे.

विमानसेवेत झालेल्या कपातीमुळे पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. 30 सप्टेंबरनंतरही या सेवा पूर्ववत सुरू झाल्या नाहीत, तर पर्यटनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर पर्यायी विमानसेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून इतर विमान कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!