महाराष्ट्रात ‘या’ तारखेपासून पावसाचा जोर वाढणार; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने आता वेग पकडण्यास सुरुवात केली आहे. 2 जून रोजी केरळमध्ये प्रवेश केलेला मान्सून अरबी समुद्रात जवळपास 15 दिवस रेंगाळल्याने महाराष्ट्रात त्याचे आगमन उशिरा झाले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील काही दिवस पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 1 जुलैपासून राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून विविध जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवसांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, पावसाअभावी रखडलेल्या खरीप पेरण्यांमुळे शेतकरी चिंतेत होते. पेरणीसाठी सर्व तयारी पूर्ण असतानाही पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी कामे थांबली होती. आता अपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातही पुढील तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, 29 आणि 30 जून तसेच 2 जुलैदरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच 1 ते 5 जुलै या कालावधीतही पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली असली, तरी जुलैच्या सुरुवातीपासून राज्यात समाधानकारक पावसाची परिस्थिती निर्माण होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मदत होणार असून, पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या भागांनाही काहीसा दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये, विशेषतः आसाममध्ये, मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून, महाराष्ट्रातही पुढील काही दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.