LPG ग्राहकांसाठी मोठी खुशखबर! सिलेंडर कुठपर्यंत पोहोचला हे आता मोबाईलवरच पाहा

मुंबई : एलपीजी गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर तो नेमका कधी घरी पोहोचणार, डिलिव्हरीसाठी रवाना झाला आहे का किंवा अजून एजन्सीकडेच आहे का, याबाबत ग्राहकांना अनेकदा संभ्रम असतो. मात्र आता ही चिंता दूर होणार आहे. इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस या प्रमुख कंपन्यांनी ग्राहकांसाठी सिलेंडर ट्रॅकिंगची सुविधा अधिक सक्षम केली असून मोबाईलवरूनच डिलिव्हरीचा संपूर्ण तपशील पाहणे शक्य झाले आहे.

सिलेंडर बुक केल्यानंतर ग्राहकांना ऑर्डर स्वीकारली गेली आहे का, ती प्रक्रियेत आहे का, सिलेंडर डिस्पॅच झाला आहे का आणि तो घरी पोहोचण्यास किती वेळ लागेल, याची माहिती मिळू शकते. यामुळे वारंवार एजन्सीशी संपर्क साधण्याची गरज कमी होणार आहे.
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी संबंधित गॅस कंपनीचे अधिकृत मोबाईल अॅप डाउनलोड करावे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने लॉगिन केल्यानंतर ‘My Booking’ किंवा ‘Track Cylinder’ या पर्यायातून सिलेंडरची सद्यस्थिती पाहता येते. येथे बुकिंगची तारीख, ऑर्डर क्रमांक, डिस्पॅच अपडेट आणि अपेक्षित डिलिव्हरी वेळ यासारखी माहिती उपलब्ध असते.

मोबाईल अॅप वापरणे शक्य नसल्यास संबंधित कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊनही सिलेंडर ट्रॅक करता येतो. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, ग्राहक क्रमांक किंवा LPG आयडी टाकावा लागतो. त्यानंतर बुकिंगचा संपूर्ण तपशील स्क्रीनवर दिसतो.

स्मार्टफोन नसलेल्या ग्राहकांसाठी एसएमएस आणि आयव्हीआरएस सेवाही उपलब्ध आहे. बुकिंगनंतर कंपन्यांकडून वेळोवेळी अपडेट्स पाठवले जातात. तसेच हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करूनही माहिती मिळवता येते. इंडेन गॅससाठी 7718955555, एचपी गॅससाठी 7903105555 आणि भारत गॅससाठी 7715012345 हे क्रमांक उपलब्ध आहेत.
डिजिटल सुविधांमुळे आता LPG ग्राहकांना डिलिव्हरी प्रक्रियेची अचूक माहिती मिळणार असून वेळेची बचत आणि सेवेत पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.