होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करताना काळाचा घाला; लोहगडावरून 400 फूट दरीत पडून तरुणाचा मृत्यू

लोणावळा : आयुष्याच्या नव्या प्रवासाची स्वप्ने डोळ्यांत साठवून होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी घडली. काही महिन्यांवर येऊन ठेपलेले लग्न आणि भविष्यातील सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाला काळाने अचानक गाठल्याने कुटुंबीयांसह होणाऱ्या वधूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केतन विशाल अग्रवाल (वय 26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो मावळ तालुक्यातील गहुंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत राहत होता. केतनचे नोव्हेंबर महिन्यात लग्न होणार होते. होणाऱ्या पत्नीचा वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी तो गुरुवारी सकाळी स्वतःच्या कारने तिच्यासह लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता.
सकाळी साडेदहाच्या सुमारास दोघेही गडावरील विविध ठिकाणी फिरत असताना केतन एका कड्याजवळ पोहोचला. यावेळी अचानक त्याचा तोल गेल्याने तो सुमारे 400 ते 450 फूट खोल दरीत कोसळला. मोठ्या उंचीवरून पडल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा सुरू केला. दरम्यान, बचावकार्यासाठी शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले.

दरीतील घनदाट झाडी, निसरडा परिसर आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकातील स्वयंसेवकांनी सुमारे तीन तास अथक प्रयत्न करत खोल दरीत उतरून केतनचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह गडाच्या पायथ्याशी आणून पुढील तपासणीसाठी तळेगाव दाभाडे येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
या घटनेमुळे लोहगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पावसाळ्यात ट्रेकिंग करताना पर्यटकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत.