वृद्ध महिला एकटीच; संध्याकाळच्या वेळी ‘तो’ घरात शिरला अन्… त्या भयंकर घटनेनं पुणे हादरलं…

पिंपरी-चिंचवड : चऱ्होली बुद्रुक परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हत्याकांडाने संपूर्ण शहर हादरले आहे. घरात एकट्या असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे, त्यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुरानेच सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी हा खून केल्याचा आरोप असून, दिघी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपीला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला काकासाहेब गिलबिले (वय ७५, रा. चऱ्होली बुद्रुक) या मंगळवारी दुपारच्या सुमारास घरात एकट्याच होत्या. याच संधीचा फायदा घेत आरोपी घरात शिरला. त्याने वृद्ध महिलेवर हल्ला करत धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरला आणि हत्या केल्यानंतर घरातील सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच दिघी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान मृत महिलेच्या हातातील सोन्याची पाटली आणि कानातील कर्णफुले गायब असल्याचे आढळून आले. त्यामुळे चोरीच्या उद्देशानेच हत्या झाल्याचा संशय बळावला.

तपासाची सूत्रे शेतात काम करणाऱ्या भगवान दगडूजी पाटील (वय ४८) याच्याकडे वळली. मात्र, घटनेनंतर तो फरार झाला होता. आरोपी आपल्या मूळ गावी पळून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दिघी पोलिसांचे विशेष पथक तातडीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रवाना झाले.

गंगापूर परिसरात सापळा रचून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने चोरीच्या उद्देशानेच वृद्ध महिलेची हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा अवघ्या १२ तासांत उलगडा करून आरोपीला अटक केल्याने दिघी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.