‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगलेचा धक्कादायक अंत; सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चांना उधाण

नालासोपारा : मराठी आणि हिंदी टीव्ही तसेच चित्रपटसृष्टीत अभिनयाने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री संचिता उगले हिने नालासोपारा येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना रविवारी सायंकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान घडली. त्या वेळी घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत तिने बेडरूममध्ये साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. घरातील सदस्य बाहेरून परत आल्यानंतर तिला तातडीने वसई-विरार महानगरपालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी अभिनेत्री घरात एकटी होती. आचोळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही, त्यामुळे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संचिता उगलेने ‘कुमकुम भाग्य’, ‘वागले की दुनिया’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली होती. तसेच तिने काही चित्रपट प्रकल्पांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. विशेषतः ‘छावा’ चित्रपटात ताराराणीची भूमिका साकारल्याची चर्चा असून तिच्या अभिनयाचे कौतुकही झाले होते.

दरम्यान, घटनेच्या काही तासांपूर्वी तिने सोशल मीडियावर अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा व्हिडिओ शेअर करत “It’s again 14 June” आणि “We missed uhh Sushant Sir” असा संदेश लिहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तिच्या मानसिक स्थितीबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.
तिच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील ताणतणाव, कामाचा दबाव आणि सोशल मीडिया पोस्ट याबाबत चौकशी सुरू केली आहे.
या घटनेनंतर सहकलाकार, चाहते आणि संपूर्ण मनोरंजनविश्वातून शोक व्यक्त केला जात आहे. तरुण वयात घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.