रोहित पवारांची तब्येत ढासळली, बीपी-शुगर लो, डॉक्टर अलर्ट, कुटुंब हळहळले

पंढरपूर : शेतकरी कर्जमाफीतील अटी हटवाव्यात या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूरमध्ये सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस असून त्यांची तब्येत खालावली आहे. बीपी आणि शुगर लो झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून वैद्यकीय पथकाने सलाईन देण्याची तयारी केली आहे. मात्र रोहित पवार यांनी सलाईन घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत ज्या शेतकऱ्यांकडे दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज आहे, त्यांनी अतिरिक्त रक्कम आधी भरावी अशी अट घालण्यात आली आहे. या अटीला विरोध करत रोहित पवार यांनी ही योजना नसून शेतकऱ्यांकडून वसुली असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सरसकट दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची मागणी करत हे आंदोलन सुरू ठेवले आहे.
रोहित पवार यांनी सांगितले की, मंत्री गिरीश महाजन यांचा मला फोन आला असून ते दोन तासांत भेटण्यासाठी येणार आहेत. सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतरच पुढील निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तोपर्यंत ओआरएस किंवा सलाईन स्वीकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आंदोलनस्थळी त्यांच्या पत्नी कुंती पवार, आई सुनंदा पवार आणि मुलगा उपस्थित असून कुटुंब भावुक झाले आहे. कुटुंबीयांच्या डोळ्यात पाणी आल्याचे दृश्य पाहायला मिळाले. आंदोलनामुळे पंढरपूर परिसरात राजकीय वातावरण तापले असून या मुद्द्यावर राज्यभरात चर्चा सुरू आहे.
