हिंजवडी हादरली! आयटी अभियंत्याने जीवन संपवले; सुसाईड नोटमुळे कंपनीतील मानसिक छळाचे आरोप उघड

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी हबमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ४८ वर्षीय आयटी अभियंता अमित ब्राम्हे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ जून रोजी घडली. या प्रकरणामुळे संपूर्ण आयटी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमित ब्राम्हे हे नामांकित आयटी कंपनीत कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना दोन पानांची सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये त्यांनी कंपनीतील दोन वरिष्ठ महिला सहकाऱ्यांवर तसेच एका मित्रावर गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. या सुसाईड नोटमुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे.
अमित यांनी आपल्या चिठ्ठीत कंपनीतील अर्चना आणि शाश्वती या दोन वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून मानसिक छळ होत असल्याचा उल्लेख केला आहे. कामाच्या ठिकाणी जाणूनबुजून कठीण प्रोजेक्ट्स देणे, प्रोजेक्ट्स काढून घेणे, इतर कर्मचाऱ्यांसमोर अपमान करणे आणि नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकणे असा त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच त्यांच्या मित्र विनोद पालीचा याने खोट्या तक्रारी करून कंपनीत बदनामी केल्याचाही उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. या सततच्या मानसिक तणावामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहिल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणी भोसरी पोलिसांनी सुसाईड नोटच्या आधारे तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कामाचा ताण, मानसिक दबाव आणि कार्यस्थळावरील अंतर्गत वाद यावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कर्मचारी मानसिक आरोग्य आणि कामाच्या वातावरणाबाबत चर्चेला उधाण आले आहे.