अंगावर काटा आणणारा अपघात: टाटा सफारीची दुचाकीला धडक; अनिकेत वाघचा मृत्यू, एक गंभीर जखमी


पुणे : पुणे–नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील जैदवाडी हद्दीत घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भरधाव वेगातील टाटा सफारी कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी येथील अनिकेत एकनाथ वाघ (वय २७) आणि आंबेगाव तालुक्यातील धनेश बबन जाधव (वय २८) हे दोघे मोटारसायकल (क्रमांक MH 14 GG 2006) वरून राजगुरुनगरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या टाटा सफारी (क्रमांक MH 14 JU 5455) या कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की अनिकेत वाघ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर धनेश जाधव गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जखमीवर तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात कार चालक अजितकुमार विनोदकुमार बाजपेयी याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरधाव आणि निष्काळजी वाहन चालवल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून रस्ते सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!