बीड हादरलं! ‘तू काळी, पांढऱ्या पायाची आहेस’ असे म्हणत 2 लाखांच्या हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या..


बीड : जिल्ह्यातील कुटेवाडी येथे एका 23 वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित छळाला आणि सततच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून विवाहितेने जीवन संपवल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात छळ करून हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पती, सासू आणि सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत विवाहितेचे नाव संध्या घुले (वय 23) असे आहे. संध्या यांचा विवाह 20 मे 2022 रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी झाला होता. विवाहावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी 4 लाख रुपये हुंडा आणि एक तोळे सोने दिले होते. मात्र, त्यानंतरही सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरूच असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मृत महिलेच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही दिवसांतच संध्याला तू काळी आहेस, तुला स्वयंपाक येत नाही, तू पांढऱ्या पायाची आहेस, असे टोमणे मारत सासरच्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली.

तसेच माहेरहून ऑटो रिक्षा खरेदीसाठी आणखी 2 लाख रुपये आणण्याची मागणी केली जात होती. पैसे न आणल्याने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, कुटेवाडी येथील एका विहिरीत संध्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप करत तक्रार दिली होती.

प्राथमिक चौकशीत सासरच्या मंडळींकडून छळ झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी पती पवन कुटे, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पती आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली असून सासू फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मृत संध्याच्या वडिलांनीही गंभीर आरोप केले आहेत. हुंडा देऊनही पैशांसाठी मुलीचा छळ करण्यात आला. दोन लाख रुपयांसाठी तिला मारहाण केली जात होती. काही काळ ती आमच्याकडे राहायला आली होती.

मात्र, त्रास देणार नाही असे आश्वासन देऊन तिला पुन्हा सासरी नेण्यात आले. त्यानंतर पुन्हा छळ सुरू झाला आणि अखेर माझ्या मुलीचा खून करून तिला विहिरीत टाकण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!