‘मला बाळ नको, तुला या कामासाठी आणलंय…’; हवेली तालुक्यात गर्भवती पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य, लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

लोणी काळभोर : लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या एका 23 वर्षीय विवाहितेच्या आयुष्यात मात्र छळ आणि वेदनाच आल्या. सासूची सेवा करण्यासाठी घाईघाईने विवाह लावून दिल्यानंतर काही दिवसांतच माहेरून 5 लाख रुपये आणण्याची मागणी, सततचे टोमणे, मानसिक व शारीरिक छळ आणि गर्भपातासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार हवेली तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

समीक्षा प्रज्योत बांगर (वय 23, सध्या रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, मूळ रा. बांगरवस्ती, केसनंद) यांनी थेऊर पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती प्रज्योत प्रकाश बांगर, सासरे प्रकाश पांडुरंग बांगर, नणंद प्राजक्ता निखील फरगडे आणि नणदोबा निखील फरगडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीक्षा यांचा विवाह 16 मार्च 2024 रोजी प्रज्योत बांगर यांच्यासोबत झाला होता. लग्नासाठी वधूपित्याने चार तोळे सोने तसेच संपूर्ण विवाहाचा खर्च केला होता. सासू कॅन्सरग्रस्त असल्याने घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी लग्न लवकर करण्यासाठी सासरच्या मंडळींकडून आग्रह करण्यात आला होता.

लग्नानंतर सासरी गेल्यावर सासू आणि नणंद सतत टोमणे मारत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. “तुझ्या आई-वडिलांनी काही दिले नाही, तुला आमच्या गळ्यात टाकले,” असे म्हणत अपमान केला जात होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, समीक्षा गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पतीने “आईची सेवा करण्यासाठी तुला आणले आहे, आता मला बाळ नको,” असे सांगत गर्भपातासाठी दबाव टाकल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मात्र, त्यांनी त्यास नकार दिल्यानंतर छळ अधिक वाढल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
याशिवाय माहेरहून 5 लाख रुपये आणून देण्याची मागणी पती, सासरे, नणंद आणि नणदोबा वारंवार करत होते. गर्भवती असतानाही घरातील सर्व कामे करून घेत मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सात महिन्यांची गर्भवती असताना झालेल्या वादात नणदोबाने शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर 11 एप्रिल 2025 रोजी पतीने पत्नीला माहेरी सोडले. “चार-पाच दिवसांत घेऊन जाईन,” असे सांगून गेलेले पती पुन्हा परतलेच नाहीत, असा आरोपही करण्यात आला आहे. 1 जुलै 2025 रोजी समीक्षा यांनी कुंजीरवाडी येथे एका मुलीला जन्म दिला. मात्र, मुलीच्या जन्मानंतरही पती किंवा सासरच्या मंडळींनी कोणतीही विचारपूस केली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
सध्या समीक्षा आपल्या दहा महिन्यांच्या मुलीसह माहेरी राहत आहेत. कौटुंबिक वाद मिटावा यासाठी ‘भरोसा सेल’मार्फत समुपदेशनाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पतीने समुपदेशनास नकार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी पैशांची मागणी, मारहाण, शिवीगाळ तसेच मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.