‘आरोग्याशी खेळणाऱ्यांवर एफडीएचा बुलडोझर!’ तुकाराम मुंढेंच्या धडक मोहिमेत 102 आरोपी अटकेत; 1.58 कोटींचा मुद्देमाल जप्त


मुंबई : राज्यातील प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, भेसळयुक्त आणि असुरक्षित अन्नपदार्थांच्या अवैध व्यवसायावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठा घाव घातला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली 25 मे ते 31 मे 2026 दरम्यान राबविण्यात आलेल्या राज्यव्यापी धडक मोहिमेत 103 आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत 102 आरोपींना अटक करण्यात आली असून 86 आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. तसेच तब्बल 1 कोटी 58 लाख 28 हजार 677 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे गुटखा-पानमसाला माफिया तसेच भेसळयुक्त अन्नपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागात एकाचवेळी छापेमारी करून मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली.

एफडीएने भारतीय न्याय संहितेतील कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यातील विविध तरतुदींनुसार गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत 34 लाख 5 हजार 48 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याचा साठा जप्त करण्यात आला.

कोकण विभाग कारवाईत अव्वल ठरला. येथे 47 आस्थापनांवर छापे टाकून 46 जणांना अटक करण्यात आली. मुंबई विभागात 22 कारवाया करत 23 आरोपींना अटक करण्यात आली.

दरम्यान, “Safe Food, Safe Drug, Safe Maharashtra” मोहिमेअंतर्गत भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थांवरही एफडीएने मोठी कारवाई केली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 73 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. आंबे, खवा, बुंदी लाडू, बेकरी पदार्थ, दूध व दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल, तूप, मसाले, आईस्क्रीम, कुल्फी, खजूर, गूळ आणि शेंगदाणा चिक्की यांसह विविध खाद्यपदार्थांचा 1 कोटी 24 लाख 23 हजार 629 रुपयांचा आणि 90 हजार 639 किलो साठा जप्त करण्यात आला.

जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून दोषी आढळणाऱ्यांविरोधात पुढील कठोर कारवाई केली जाणार आहे.

याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नाही. शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाईल.”

एफडीएच्या या धडक मोहिमेमुळे राज्यातील अवैध गुटखा-पानमसाला विक्रेते आणि भेसळखोरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!