महागाईच्या रणांगणात नवी मुंबई पेटली! रोहिणी खडसेंना पोलिसांनी उचलून नेले; रोहित पवार, आव्हाडांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना ताब्यात घेतलं…


नवी मुंबई : महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून नवी मुंबईत आज राजकीय संघर्षाचा मोठा स्फोट पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आयोजित आंदोलनादरम्यान पोलिस आणि कार्यकर्ते आमनेसामने आल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. आंदोलनाला रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाई करत रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, रोहिणी खडसे यांना पोलिसांनी हात-पाय धरून उचलून नेत असल्याचे दृश्य समोर आल्याने या आंदोलनाची राज्यभर जोरदार चर्चा रंगली आहे.

महागाई, बेरोजगारी आणि वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटरबाहेर आंदोलन छेडण्यात आले होते. आंदोलकांनी चूल मांडून, भांडी वाजवत आणि सरकारविरोधी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. वाढत्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाल्याचा आरोप करत सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखले. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद, ढकलाढकली आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. यामध्ये आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, रोहिणी खडसे, सक्षणा सलगर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

घटनेनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. “महाराष्ट्रात आता आंदोलन करण्याचाही अधिकार उरलेला नाही का? लोकशाही मार्गाने प्रश्न मांडणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांच्या माध्यमातून रोखण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो,” असे ते म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर निशाणा साधताना सांगितले की, “देशात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराचा आलेख सातत्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना सरकार मात्र दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे जनतेच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे.”

दरम्यान, नवी मुंबईतील या आंदोलनानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून महागाईच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!