कोन आईस्क्रीममध्ये निघाला 3 इंचांचा किडा! लहान मुलगा खात असतानाच धक्कादायक प्रकार उघड

ठाणे : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातून अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लहान मुलाने खरेदी केलेल्या कोन आईस्क्रीममध्ये तब्बल तीन इंच लांबीचा किडा आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेतील रचना पार्क परिसरात राहणाऱ्या शशांक जाधव या मुलाने स्थानिक दुकानातून कोन आईस्क्रीम खरेदी केले होते. आईस्क्रीम खाण्यास सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये किडा असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. हा प्रकार समोर येताच कुटुंबीयांनी तातडीने संबंधित दुकान गाठून संताप व्यक्त केला.
आईस्क्रीमची तपासणी केली असता त्यामध्ये लांब आणि जाड किडा असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे संबंधित उत्पादनावरील एक्सपायरी डेट 2027 पर्यंत वैध असल्याचेही समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच दुकानदाराने संबंधित कंपनीच्या वितरकाला घटनास्थळी बोलावले. मात्र, दुकानदाराने हे उत्पादन कंपनीकडून सीलबंद अवस्थेत मिळाल्याचे सांगत आपली जबाबदारी नाकारली. वितरकानेही कोणतीही चूक मान्य न करता तेथून निघून गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकारामुळे मुलाच्या पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पालकांच्या म्हणण्यानुसार, हा केवळ निष्काळजीपणाचा प्रकार नसून ग्राहकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळणारा गंभीर प्रकार आहे. हा किडा मुलाच्या नकळत पोटात गेला असता तर गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकल्या असत्या, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.