“धाड…धाड…धाड!” धनंजय मुंडेंकडून गोळीबार; मुंडे-देशमुख वादाने बीडमध्ये राजकीय भूकंप


बीड : “माझ्यासमोर गाडी आडवी लावून धनंजय मुंडे यांनी हवेत दोन राऊंड फायर केले,” असा गंभीर आणि खळबळजनक आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. या दाव्यानंतर बीड जिल्ह्यात तसेच संपूर्ण राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर प्राथमिक तपासात तक्रारीत तथ्य नसल्याचे समोर आले होते.

मात्र आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून धनंजय देशमुख यांनी थेट माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, “मुंडे यांनी माझ्यासमोर गाडी आडवी लावली आणि हवेत दोन राऊंड फायर केले.” या आरोपानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांनी या घटनेबाबत अधिकृत तक्रार देणार असल्याचेही सांगितले आहे.

दरम्यान, या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर समाधान खिंडकर यांनी धनंजय देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. खिंडकर यांच्या म्हणण्यानुसार, धनंजय देशमुख यांनी त्यांच्या अंगरक्षकाचे पिस्तूल काढून त्यांच्या डोक्यावर ठेवले आणि धमकी देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या तक्रारीच्या आधारे बीड ग्रामीण पोलिसांनी देशमुख यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न (कलम 307) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला, तसेच संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर जप्त करण्यात आले. या प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तब्बल सात तास केली. अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले.

तपासाच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, आरोप केलेली घटना घडल्याचे कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशमुख यांच्यावरील गुन्ह्याबाबतही संशय निर्माण झाला आहे.

दुसरीकडे, धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र देशमुख यांनी केलेल्या नव्या आरोपामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील कारवाई काय होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!