‘माझा गुन्हा का दाखल केला नाही?’; दारूच्या नशेत पोलिस चौकीत महिलेचा राडा, नऱ्हेत तासभर हायव्होल्टेज ड्रामा

पुणे : पोलिस चौकीत आलेली एक महिला अचानक संतापाने भडकली, आवाज चढला, आरडाओरडा सुरू झाला आणि काही क्षणांत संपूर्ण चौकीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. “माझ्या तक्रारीवर गुन्हा का दाखल केला नाही?” या एकाच प्रश्नावरून सुरू झालेला वाद इतका वाढला की पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. अखेर वैद्यकीय तपासणीत संबंधित महिला दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले आणि संपूर्ण प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 41 वर्षीय महिला तिच्या तक्रारीसंदर्भात नऱ्हे पोलिस चौकीत आली होती. काही दिवसांपूर्वी, 27 मे रोजी तिच्या तक्रारीवरून एका व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे संबंधित व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल झाला नसल्याने ती नाराज होती.
याच मुद्द्यावरून चौकीत आल्यानंतर तिने संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला पोलिसांकडे आक्रमकपणे जाब विचारल्यानंतर तिचा आवाज चढला आणि काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालत तिने मोठ्याने आरडाओरडा केला. तसेच पोलिसांशी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.

घटनेमुळे चौकीतील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले. त्यावेळी विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांनाही या गोंधळाचा फटका बसला. तक्रारींची नोंद, चौकशी आणि इतर शासकीय कामकाज काही काळ विस्कळीत झाल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित महिलेला वारंवार शांत राहण्याचे आणि चौकीबाहेर जाण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र ती कोणत्याही सूचना ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

घटनेनंतर पोलिसांनी महिलेची वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला. तिला ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.
या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणे आणि शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नऱ्हे पोलिस चौकीतील पोलिस उपनिरीक्षक यांनी याबाबत तक्रार दिली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, पोलिस ठाणे किंवा शासकीय कार्यालयांमध्ये येऊन गोंधळ घालणे आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.