पवार गटाला मोठा राजकीय धक्का: जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये दाखल; अहिल्यानगरमध्ये खळबळ


अहिल्यानगर : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी आमदार आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करत सर्वांनाच धक्का दिला आहे. जयंत पाटलांचे निकटचे नातेवाईक आणि पवार गटातील महत्त्वाचे चेहरा असलेले तनपुरे यांच्या या निर्णयामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात राजकीय भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या अचानक घडामोडीमुळे पवार गटाला मोठा झटका बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपकडून प्राजक्त तनपुरे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील त्यांचा प्रभाव आणि संघटनात्मक ताकद पाहता पक्ष त्यांना मोठी जबाबदारी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे असल्याने हा प्रवेश अधिकच चर्चेत आला आहे. काही दिवसांपासून त्यांच्या भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज अखेर पूर्णविराम मिळाला.

तनपुरे यांनी हा निर्णय घेताना कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी थेट संवाद न साधल्याचेही त्यांनी मान्य केले. “माझी भूमिका मी सुप्रिया सुळे यांच्यासमोर मांडली होती,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या राजकीय घडामोडीवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी हा निर्णय अनपेक्षित असल्याचे सांगितले. “त्यांचा भाजप प्रवेश झाल्याचे मी काही वेळापूर्वीच ऐकले. हा आमच्यासाठी धक्का आहे,” असे ते म्हणाले.

या प्रवेशामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला याचा मोठा फायदा होणार असल्याचेही मानले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!