जनगणना कामास नकार; पाच शिक्षकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांत गुन्हा दाखल, तहसील प्रशासनाची कठोर कारवाई


लोणी काळभोर : केंद्र सरकारच्या जनगणना कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी लोणी काळभोर परिसरातील पाच शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शैक्षणिक व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तहसील प्रशासनाने आदेश देऊनही संबंधित शिक्षक जनगणना कामासाठी हजर न राहिल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिल्पा राजाभाऊ येरमाळकर, सुनिल दिलीप शेळके, शिवाजी संभाजी गायाकवाड, प्रदीप बबन पारधी व शन्नो जॉक्सन गगादे या शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर तहसील हद्दीत जनगणना २०२७ चा कार्यक्रम राबविण्यात येत असून या कामासाठी संबंधित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. चार्ज ऑफिसर तथा तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी शासनाच्या पोर्टलद्वारे तसेच पर्यवेक्षक अधिकाऱ्यांमार्फत आदेश दिले होते. मात्र, आदेश मिळूनही संबंधित शिक्षकांनी जनगणना कामासाठी हजर राहण्यास टाळाटाळ करून काम करण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे.

प्रशासनाच्या मते, जनगणना प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याच्या उद्देशाने संबंधित शिक्षकांनी आदेश धाब्यावर बसवले. त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी अमोल गव्हाणे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पाचही शिक्षकांविरुद्ध जनगणना अधिनियम १९४८ च्या कलम ११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!