MBBS विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! अभ्यास पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण…

नवी दिल्ली : एमबीबीएस शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) ‘ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन सुधारणा नियम 2026’ अंतर्गत एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी असलेली कमाल मुदत 9 वर्षांवरून 10 वर्षे करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, या सवलतीसोबत विद्यार्थ्यांवर काही कठोर नियमही लागू करण्यात येणार आहेत.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, विद्यार्थ्यांना प्रवेश घेतल्यापासून संपूर्ण एमबीबीएस अभ्यासक्रमासह एक वर्षाची अनिवार्य रोटेटरी मेडिकल इंटर्नशिप पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्षांचा कालावधी मिळणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 9 वर्षांची होती. आरोग्यविषयक अडचणी, वैयक्तिक कारणे किंवा शैक्षणिक ताणामुळे अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करणे कठीण जात असल्याने हा बदल सुचवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, या प्रस्तावात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी केवळ चार संधी दिल्या जाणार आहेत. चार प्रयत्नांनंतरही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास संबंधित विद्यार्थ्याचा वैद्यकीय शिक्षणातील प्रवेश रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

नव्या नियमांमुळे वैद्यकीय शिक्षणातील काही दीर्घकालीन समस्यांवरही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी होणाऱ्या परीक्षांची तयारी करण्यासाठी काही विद्यार्थी मुद्दाम इंटर्नशिप पूर्ण करण्यास विलंब करत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. यामुळे महाविद्यालयांमधील वसतिगृहांच्या खोल्या आणि इतर सुविधा दीर्घकाळ अडवून ठेवल्या जात असल्याचेही निदर्शनास आले होते.

नव्या प्रस्तावानुसार, विद्यार्थ्यांना एमबीबीएस शिक्षण आणि इंटर्नशिप मिळून संपूर्ण अभ्यासक्रम 10 वर्षांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे. निर्धारित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास वैद्यकीय पदवी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एकीकडे दिलासादायक तर दुसरीकडे शिस्तीवर भर देणारी महत्त्वाची सुधारणा मानली जात आहे.