पुणेकरांसाठी मोठी गुड न्यूज! बाह्य रिंग रोडच्या कामांना गती; खडकवासलावर पूल, सिंहगड परिसरात बोगद्यांचे काम जोमात…


पुणे : वाहतूक कोंडीमुळे त्रस्त असलेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. बहुप्रतिक्षित पुणे बाह्य रिंगरोड प्रकल्पाचे काम आता वेगाने सुरू असून, येत्या काही वर्षांत शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणण्याची तयारी सुरू आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारला जाणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

शहराच्या बाहेरून जाणारा हा 173 किलोमीटर लांबीचा सहापदरी रिंगरोड पुण्याभोवती वर्तुळाकार मार्ग निर्माण करणार आहे. त्यामुळे मुंबई, कोकण, नाशिक, अहिल्यानगर, सासवड तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना शहरात प्रवेश न करता थेट इच्छित मार्गावर जाता येणार आहे. परिणामी वाहतूक कोंडी कमी होण्यासह प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे 1554.64 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून काम विविध टप्प्यांमध्ये सुरू आहे. संपूर्ण प्रकल्पाचे 12 पॅकेजेसमध्ये विभाजन करण्यात आले आहे. यापैकी काही भाग पूर्वेकडे तर काही भाग पश्चिमेकडे आहेत. विशेष म्हणजे पश्चिमेकडील भागातील कामाला चांगली गती मिळाल्याचे दिसून येत आहे.

पश्चिम विभागातील काम अधिक आव्हानात्मक मानले जाते. डोंगराळ भूभाग, घाटरस्ते आणि नैसर्गिक अडथळ्यांमुळे येथे अनेक मोठ्या अभियांत्रिकी संरचना उभाराव्या लागत आहेत. या भागात 8 जुळे बोगदे, व्हायाडक्ट, 10 पूल, 26 ओव्हरपास आणि 9 पादचारी अंडरपास उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे.

याशिवाय खडकवासला धरण परिसरात सुमारे 500 मीटर लांबीच्या पुलाचे काम सुरू असून कल्याण गावाजवळही बांधकाम वेगाने सुरू आहे. सध्या चाकण, खडकवासला, मुळशी, हिंजवडी, सिंहगड, उर्से, सोरतापवाडी आणि वाडेबोल्हाई परिसरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. तसेच सांगरूण आणि डावजे गावांजवळील बोगद्यांच्या कामालाही गती मिळाली आहे.

पुणे रिंगरोडची संकल्पना सर्वप्रथम 2007 मध्ये मांडण्यात आली होती. त्यानंतर विविध प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियांनंतर आता प्रत्यक्ष काम वेगाने सुरू आहे. सध्या प्रकल्पातील चार प्रमुख विभागांमध्ये बांधकाम प्रगतीपथावर असून 2028 पर्यंत संपूर्ण रिंगरोड वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः मुंबई, कोकण, नाशिक, सासवड आणि अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार असून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तो महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!