पुणेकरांनो लक्ष द्या! सेकंड हँड वाहन खरेदी-विक्रीसाठी RTO ने लागू केला नवा नियम..


पुणे : शहरात जुनी दुचाकी आणि चारचाकी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार आता जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक विक्रेता आणि आस्थापनाला अधिकृत प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. परवानगीशिवाय व्यवसाय करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.

नवीन नियमांनुसार, जुनी वाहने खरेदी-विक्री किंवा एक्स्चेंज करणाऱ्या व्यावसायिकांना ‘नोंदणीकृत वाहन विक्रेत्याचे अधिकृतता पत्र’ (फॉर्म 29C) प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. यामुळे वाहन व्यवहार अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि कायदेशीर पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.

सध्या अनेक ठिकाणी वाहन विक्री केंद्रांमार्फत वाहने पुढे विकली जात असली, तरी त्यांचे मालकी हस्तांतरण वेळेत होत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे वाहन वापरणारी व्यक्ती आणि नोंदणीकृत मालक वेगळे राहतात. अशा परिस्थितीत फसवणूक, मालकी हक्काचे वाद तसेच चोरीच्या वाहनांच्या

व्यवहारांना खतपाणी मिळत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांच्या माहितीनुसार, संबंधित विक्रेत्यांनी प्रथम फॉर्म 29A अंतर्गत अर्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर आरटीओकडून तपासणी होऊन पात्र विक्रेत्यांना फॉर्म 29B नुसार अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल. यामुळे विक्रेत्यांना खरेदी केलेली वाहने स्वतःच्या केंद्राच्या नावावर नोंदवता येणार असून पुढे ग्राहकांच्या नावावर हस्तांतरणाची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.

आरटीओने सर्व संबंधित आस्थापनांना तातडीने अर्ज सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मोटार वाहन निरीक्षकांच्या तपासणीनंतरच प्रमाणपत्र मंजूर केले जाणार असून, सर्व निकष पूर्ण करणाऱ्या विक्रेत्यांनाच अधिकृत मान्यता मिळणार आहे.

दरम्यान, अनधिकृत दलालांमार्फत मोठ्या प्रमाणावर वाहन व्यवहार होत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन सरकारने नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे आता जुनी वाहने खरेदी करताना ग्राहकांनाही अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यवहाराचा लाभ मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!