‘I Love You’नंतर थेट कर्जाचा सापळा! 140 तरुणींना लुटणारा लव्ह स्कॅमर अखेर जाळ्यात


डोंबिवली : सोशल मीडियावर गोड बोलून ओळख वाढवायची, प्रेमाचं नाटक करायचं आणि विश्वास बसताच लाखोंचा डल्ला मारायचा… डोंबिवलीत उघडकीस आलेल्या एका भामट्याच्या कारनाम्यांनी पोलिसही हादरले आहेत. तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या नावावर कोट्यवधींची कर्जे काढणाऱ्या आदर्श म्हात्रे या सराईत आरोपीला मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्याच्या फसवणुकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पनवेल परिसरात राहणारा आदर्श म्हात्रे सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवरून तरुणींशी संपर्क साधत असे. सुरुवातीला तो अतिशय सभ्य आणि काळजीवाहू व्यक्ती असल्याचा आव आणत मैत्री करायचा. काही दिवसांतच सततच्या संवादातून संबंधित तरुणींचा विश्वास संपादन करून प्रेमसंबंध निर्माण करत असे. त्यानंतर आर्थिक अडचणी, व्यवसाय किंवा तातडीच्या गरजेचं कारण सांगत तो महिलांकडून वैयक्तिक माहिती आणि कागदपत्रे मिळवत होता.

या कागदपत्रांच्या आधारे आरोपी वेगवेगळ्या बँकांमधून संबंधित महिलांच्या नावावर लाखो रुपयांची कर्जे काढत होता. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक महिलांना त्यांच्या नावावर कर्ज घेतल्याची माहिती थेट बँकेच्या नोटिसा आल्यानंतरच समजली. काही महिलांच्या खात्यांतून मोठ्या रकमा वळवल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

मानपाडा पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने तब्बल 140 हून अधिक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढल्याचं समोर आलं आहे. यापैकी 11 महिलांनी पुढे येत अधिकृत तक्रारी दाखल केल्या आहेत. विशेष म्हणजे, फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्चशिक्षित असून कॉर्पोरेट, फायनान्स आणि व्यावसायिक क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांनाच आरोपी टार्गेट करत असल्याचं पोलिस तपासात स्पष्ट झालं आहे.

यापूर्वी नवी मुंबई पोलिसांनीही आरोपीला अटक केली होती. मात्र, डोंबिवलीतील एका पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुन्हा चौकशी सुरू केली आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून त्याच्याकडून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियावरील मैत्री आणि ऑनलाईन रिलेशनशिपच्या वाढत्या धोक्याबाबत पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नये, तसेच कोणालाही वैयक्तिक कागदपत्रे, बँक डिटेल्स किंवा ओटीपी शेअर करू नये, असं आवाहन केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!