“तू मागच्या जन्मी नागीन होतीस…” म्हणत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सांगलीतील ‘कडेश्वर धाम’चा काळाकुट्ट चेहरा उघड

सांगली : “तू मागच्या जन्मी नागीन होतीस… संकेत बाबा हा नाग होता… तुमचं मिलन व्हावं म्हणूनच या जन्मी तुमचा जन्म झाला…”
अशा अंधश्रद्धेच्या आणि विकृत दाव्यांच्या जाळ्यात एका अल्पवयीन मुलीला ओढून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना सांगली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पूजा, हवन, देवीचा संचार आणि दैवी शक्तींच्या नावाखाली सुरू असलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे विटा शहर हादरले आहे.

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात चालणाऱ्या ‘कडेश्वर धाम अध्यात्म संस्था’ या तथाकथित आश्रमातील भोंदूबाबांच्या कारवायांचा काळाकुट्ट चेहरा समोर आला आहे. या प्रकरणी विटा पोलिसांनी महेश मोहन बाबर, संकेत संदीप निकम आणि सूरज उपाध्ये या तिघांविरुद्ध पोक्सो, भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी काही शारीरिक आजारांनी त्रस्त होती. तिच्या या परिस्थितीचा फायदा घेत आरोपींनी तिला आणि तिच्या कुटुंबाला आपल्या जाळ्यात अडकवले. आरोपी संकेत निकम याला “शंकर बाबा”, “महाकाल”, “बाळूमामा” आणि “चिले महाराज” यांचा अवतार असल्याचे सांगत त्याच्याकडे दैवी शक्ती असल्याचा बनाव करण्यात आला.

यानंतर मुलीच्या शरीरात देवीचा संचार होत असल्याचे सांगून तिच्याकडून पूजा, हवन आणि विविध धार्मिक विधी करून घेतले गेले. अंधश्रद्धेचा कळस गाठत आरोपींनी पीडितेला, “तू मागच्या जन्मी नागीन होतीस आणि संकेत बाबा नाग होता,” अशी भ्रामक कथा सांगितली. या मानसिक प्रभावाखाली आणून आरोपी संकेत निकम याने एका खोलीत वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

इतकेच नव्हे तर, आरोपी सूरज उपाध्ये याने पीडितेला धमकावत “कोणाला काही सांगितले तर तुझे व्हिडिओ व्हायरल करू,” अशी भीती दाखवली. या भीतीमुळे मुलगी बराच काळ गप्प राहिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, पूजा आणि विशेष हवनाच्या नावाखाली आरोपींनी पीडित मुलीच्या वडिलांकडून तब्बल ५ लाख रुपयांची उकळपट्टी केली. यामध्ये ४ लाख ५० हजार रुपये बँक खात्यावर, तर ५० हजार रुपये रोख घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या आश्रमात आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषणाचे प्रकार सुरू असल्याच्या चर्चा परिसरात होत्या. काही दिवसांपूर्वी एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
अखेर सततचा मानसिक आणि शारीरिक छळ असह्य झाल्यानंतर पीडित मुलीने धाडस करून विटा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला असून, या आश्रमात आणखी काही पीडित आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.