पत्नी परत यावी, सासरची संपत्ती मिळावी म्हणून मध्यरात्री कबरस्तानात अघोरी पूजा; पुण्यातील धक्कादायक प्रकाराने खळबळ


पुणे : मध्यरात्रीची वेळ… कोंढव्यातील कौसरबाग कबरस्तान परिसर शांत होता. अचानक काही स्थानिकांना तिथे संशयास्पद हालचाली दिसू लागल्या. अंधारात मेणबत्त्यांचा प्रकाश, जमिनीवर ठेवलेली काही छायाचित्रं आणि त्यावर सुया टोचत काही विधी करणारा एक व्यक्ती… नागरिक जवळ गेले आणि समोरचं दृश्य पाहून अक्षरशः हादरले. कारण, तो व्यक्ती स्वतःच्या सासरच्या लोकांवर काळी जादू करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता.

पुण्यातील कोंढवा परिसरात सासरच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी आणि घर सोडून गेलेल्या पत्नीला पुन्हा आपल्या ताब्यात आणण्यासाठी एका जावयाने अघोरी पूजेचा मार्ग स्वीकारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी परवेज अब्दुल अजीज मेमन या आरोपीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

१९ मे रोजी रात्री १२.२० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. स्थानिक नागरिकांना कबरस्तान परिसरात काही संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे दिसले. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता आरोपी परवेज हा काही फोटो जमिनीवर ठेवून त्यावर सुया टोचत विचित्र पूजा करत असल्याचे दिसून आले. त्या छायाचित्रांमध्ये त्याची सासू, सासरे, मेव्हणा आणि मेव्हण्याच्या पत्नीचे फोटो असल्याचे समोर आले.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपीला जागीच पकडले. सुरुवातीला त्याने काहीही सांगण्यास नकार दिला. मात्र, नागरिकांनी आणि नंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी आणि सासरची संपत्ती आपल्या नावावर करण्यासाठी हे अघोरी कृत्य केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी आरोपीचा मेव्हणा हसनेन रफिक जाफरानी (वय ४०) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपी परवेज आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कौटुंबिक वाद सुरू होते. सततच्या भांडणांमुळे पत्नी त्याच्यापासून वेगळी राहत होती. याच रागातून आणि सासरच्या संपत्तीच्या लालसेपोटी आरोपीने काळ्या जादूचा आधार घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपीने यापूर्वीही अशा प्रकारचे विधी केले होते का, याचाही शोध घेतला जात आहे. दरम्यान, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही पुण्यासारख्या शहरात अशा अघोरी घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!