पुणेकरांनो लक्ष द्या! शहरात मोठे निर्बंध; पुढील काही दिवस रात्री १० नंतर हॉटेल-खाऊ गल्ली बंद…


पुणे : पुणे शहरात वाढत्या हिंसक घटना, गोळीबार आणि कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. २६ मेपासून पुढील १४ दिवस शहरात जमावबंदी लागू करण्यात आली असून रात्री १० नंतर लहान हॉटेल, फेरीवाले, फुटपाथवरील खाद्य स्टॉल आणि खाऊ गल्ली पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटना मर्यादित वेळ म्हणजे साडेदहा ते अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या छोट्या खाद्य व्यवसायांवर आता कडक निर्बंध असणार आहेत. शनिवार रात्रीपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

अलीकडे पुण्यात घडलेल्या गोळीबार, टोळीयुद्ध आणि मारहाणीच्या घटनांमुळे पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. बालाजीनगर परिसरात एका रिक्षाचालकावर झालेल्या गोळीबारानंतर शहरातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली होती. या प्रकरणात कुख्यात गुंड सूर्यकांत आंदेकर याचे नाव समोर आल्याने पोलिसांनी शहरातील गुंडगिरीवर मोठी मोहीम सुरू केली आहे.

दरम्यान, इंधन तुटवड्याच्या मुद्द्यावर विविध संघटनांकडून आंदोलन आणि मोर्चांची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदी लागू केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा निर्णय नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस प्रशासनाने पुण्यात गुन्हेगारी वाढल्याचा आरोपही फेटाळून लावला आहे. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये शहरातील गुन्हेगारी कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. डायल १११ हेल्पलाइनवर आतापर्यंत ३५ हजारांहून अधिक कॉल आले असून पोलिस अवघ्या सात मिनिटांत घटनास्थळी पोहोचत असल्याचेही प्रशासनाने सांगितले.

बेपत्ता मुलींच्या प्रकरणांवर बोलताना पोलिसांनी सांगितले की, ४९ तक्रारींपैकी ३८ मुलींचा शोध लावण्यात यश आले आहे. अनेक मुली प्रेमसंबंधांमुळे घर सोडून गेल्याचे तपासात उघड झाले असून काही मुली सोशल मीडियावरील रिल्सच्या प्रभावामुळे घरातून निघून गेल्याचेही समोर आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!