बीडमध्ये ‘त्या’ टोळीची पुन्हा दहशत? घरात घुसून महिलेवर बलात्कार; आरोपीचं वाल्मिक कराड कनेक्शन चर्चेत

बीड : बीड जिल्ह्यातील गाजलेल्या मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडच्या सहकाऱ्याच्या मुलावर एका ३१ वर्षीय महिलेवर घरात घुसून बलात्कार केल्याचा गंभीर आरोप झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप आणि खळबळ उडाली आहे.

अमर बांगर असं आरोपीचं नाव असून त्याच्याविरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे गुन्हा दाखल होऊनही आरोपी अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरात एकटी असताना आरोपीने संधी साधून घरात प्रवेश केला आणि तिच्यावर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. तिचा जबाब नोंदवून वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी अमर बांगर हा पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा आहे. किरण बांगर हे वाल्मिक कराडचे निकटचे सहकारी मानले जातात. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा आता बीडच्या राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळातही सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे, वाल्मिक कराड हा मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानला जातो आणि सध्या तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वीच त्या प्रकरणातील आरोपींनी जेलमध्ये एका कैद्याला मारहाण करून धमकावल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या घटनेनंतर आता हे नवीन प्रकरण समोर आल्याने बीड पुन्हा एकदा हादरलं आहे.
आरोपी अजूनही फरार असल्याने परिसरात भीतीचं वातावरण असून, आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू असल्याचं सांगितलं असून तपास वेगाने सुरू आहे.