५० हजार पगाराची मोठी संधी! पुणे विद्यापीठात १३३ प्राध्यापक पदांसाठी भरती; १ जूनपर्यंत अर्जाची मुदत


पुणे : राज्यातील हजारो नेट-सेट आणि पीएचडी पात्र तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अनेक दिवसांपासून कायमस्वरूपी भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आता थेट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकवण्याची संधी मिळणार आहे. विद्यापीठाने विविध विभागांमध्ये तब्बल १३३ कंत्राटी सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती जाहीर केली असून, निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ५० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांमध्ये या भरतीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

ही नियुक्ती पूर्णपणे तात्पुरत्या स्वरूपाची असणार असून ३१ मे २०२७ पर्यंत उमेदवारांची नियुक्ती राहणार आहे. विद्यापीठ प्रशासनाने २३ मेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांना १ जून २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत. कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानवविद्या, आंतरविद्याशाखीय अभ्यास यांसह विविध विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. जैवतंत्रज्ञान, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, गणित, डेटा सायन्स, माध्यम व संवाद अध्ययन, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, इंग्रजी, कायदा, इतिहास, मानसशास्त्र, समाजशास्त्र, पत्रकारिता, संगीत आणि नाट्यकला अशा अनेक शाखांमध्ये उमेदवारांना संधी उपलब्ध होणार आहे.

आरक्षणानुसार १३३ पदांपैकी अनुसूचित जातींसाठी १७, अनुसूचित जमातींसाठी ९, ओबीसींसाठी २५, ईडब्ल्यूएससाठी १३ आणि खुल्या प्रवर्गासाठी ३८ पदे राखीव ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महिला, दिव्यांग, क्रीडा आणि अनाथ प्रवर्गासाठीही स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आले आहे.

विद्यापीठाने पात्रतेसाठी स्पष्ट निकष निश्चित केले आहेत. संबंधित विषयात किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक राहणार असून यूजीसीच्या नियमांनुसार नेट, सेट किंवा पीएचडी पात्रता बंधनकारक असणार आहे. काही तांत्रिक शाखांसाठी एआयसीटीईच्या निकषांनुसार पात्रता लागू होणार आहे.

आवश्यक कागदपत्रे

* पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र
* नेट / सेट / पीएचडी प्रमाणपत्र
* जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
* आधार कार्ड
* अनुभव प्रमाणपत्र
* पासपोर्ट साईज फोटो
* स्वाक्षरीची प्रत

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागणार असून खुल्या प्रवर्गासाठी १ हजार रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ५०० रुपये अर्ज शुल्क निश्चित करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक असणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!