“गॅस २५ दिवसांत संपला तर स्वयंपाक कसा करायचा?”; केंद्राच्या नव्या नियमांनी गृहिणींची चिंता वाढली

नवी दिल्ली : स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर अचानक रिकामा झाला… आणि दुसरा सिलेंडर बुकही करता येत नाही! अशी परिस्थिती देशातील लाखो कुटुंबांवर ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मिडिल ईस्टमध्ये वाढलेल्या युद्धसदृश तणावाचा फटका आता थेट सामान्यांच्या चुलीपर्यंत पोहोचताना दिसत आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर दबाव वाढला असून केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवर नवे निर्बंध लागू केले आहेत.

देशात एलपीजी गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्राने ‘लॉकिंग पिरियड’ नियम लागू केला आहे. या नियमानुसार शहरी भागातील ग्राहकांना एक सिलेंडर घेतल्यानंतर पुढील २५ दिवसांपर्यंत दुसरा सिलेंडर बुक करता येणार नाही. तर ग्रामीण आणि दुर्गम भागात हा कालावधी तब्बल ४५ दिवसांचा असणार आहे.
गॅस टंचाईच्या चर्चांमुळे अनेकांनी अतिरिक्त सिलेंडर बुक करण्यास सुरुवात केल्याने पुरवठा व्यवस्थेवर ताण निर्माण झाला. त्यामुळे सरकारने कठोर पावले उचलल्याचे सांगितले जात आहे. हे नियम सर्व घरगुती गॅस ग्राहकांसाठी लागू असतील. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

दरम्यान, “सिलेंडर आधीच संपला तर काय करायचं?” असा प्रश्न अनेक कुटुंबांपुढे उभा राहिला आहे. अशा वेळी ग्राहकांना दुसरा सिलेंडर जोडणी घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. तसेच ५ किलो वजनाचा छोटा सिलेंडरही ओळखपत्रावर खरेदी करता येणार आहे. गरज पडल्यास तात्पुरत्या स्वरूपात व्यावसायिक सिलेंडर वापरण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

सरकारने वितरण प्रक्रियेतही मोठा बदल केला आहे. आता सिलेंडर डिलिव्हरीवेळी ग्राहकांच्या मोबाईलवर येणारा ओटीपी सांगितल्याशिवाय सिलेंडर मिळणार नाही. ‘डिलिव्हरी प्रमाणीकरण कोड’ प्रणालीमुळे गैरव्यवहार रोखण्याचा सरकारचा दावा आहे.
दरम्यान, नव्या नियमांमुळे सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम आणि चिंता वाढली असून, पुढील काही दिवसांत गॅस पुरवठ्याची परिस्थिती कशी राहते याकडे देशाचे लक्ष लागले आहे.