“एक रुपयाचा पुरावा द्या, उद्याच जीवन संपवतो”; जरांगेंच्या आक्रमक इशाऱ्याने महाराष्ट्र हादरला

जालना : अंतरवाली सराटी पुन्हा एकदा मराठा आंदोलनाच्या केंद्रस्थानी आलं… वातावरण तापलेलं, समर्थकांची गर्दी आणि त्याचवेळी मनोज जरांगेंनी केलेल्या एका विधानाने संपूर्ण राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. “मी कोणाकडून एक रुपयाही घेतल्याचं सिद्ध करा… उद्या सकाळीच जीवन संपवतो,” असा थेट आणि आक्रमक इशारा जरांगेंनी दिला. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ३० मेपासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा जरांगेंनी दिल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. आंदोलनाऐवजी चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन लाड यांनी यावेळी केले.
भेटीदरम्यान प्रसाद लाड यांनी पूर्वी आपल्यात मतभेद आणि टीका झाली होती, हे मान्य केले. मात्र, “गेल्या ७० वर्षांत मराठा समाजासाठी सर्वाधिक काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केले,” असा दावा त्यांनी केला. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही समाजासाठी मोठे काम केल्याचे ते म्हणाले.

“तीव्र उन्हाळा, पेरणीचा हंगाम आणि शाळांच्या सुट्ट्या लक्षात घेता आंदोलनासाठी हा योग्य काळ नाही. सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. मी समाजाचा कार्यकर्ता म्हणून येथे आलो आहे,” असे लाड यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.

दुसरीकडे मनोज जरांगेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विद्यार्थ्यांच्या अडकलेल्या शिष्यवृत्ती, आंदोलकांवरील लाठीचार्ज आणि आरक्षणाचा प्रश्न यावरून त्यांनी महायुती सरकारला धारेवर धरले. “आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काही चुकीचं बोललो नव्हतो, मग अंतरवाली सराटीत लाठीचार्ज का झाला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याचवेळी जरांगेंनी भावनिक आणि आक्रमक भूमिका घेत मोठं विधान केलं. “आम्ही पैशाने किंवा पदाने विकले जाणारे नाही. माझ्यावर एक रुपया घेतल्याचाही आरोप सिद्ध झाला, तर उद्या सकाळीच जीवन संपवेन,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मुदत २९ मेपर्यंत देण्यात आली असून, मागण्या पूर्ण न झाल्यास ३० मेपासून पुन्हा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सरकार पुढे कोणती भूमिका घेते आणि जरांगे आंदोलनावर ठाम राहतात का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.