पेट्रोल-डिझेलचे दर मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे तीन-चार दिवसांनी लिटरमागे 1,1 रुपयांनी वाढताहेत…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसत आहे. यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले, देशात पेट्रोल-डिझेलचे दर मेलोडीच्या चॉकलेटप्रमाणे दर तीन-चार दिवसांनी लिटरमागे १ – १ रुपयांनी वाढत असून आज त्यात पुन्हा वाढ झाली. पुढील काही दिवसांत मेलोडी चॉकलेटच्या पॅकेटप्रमाणे प्रति लिटर ५० रुपये वाढ झाली तरी आश्चर्य वाटणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले.
शिवाय ५० रुपये वाढ झाली म्हणून तुम्हाला कुणी १ लिटर पेट्रोल-डिझेल गिफ्टही देणार नाही आणि पंपावर तासनतास रांगेत उभं राहूनही पेट्रोल-डिझेल मिळेलच याचीही खात्री नाही. सुरवातीला टाळ्या-थाळ्या वाजवण्याचा प्रयोग झाल्यानंतर आता परदेशात फिरु नका, पेट्रोल-डिझेल वाचवा, असे मोदी सांगत आहेत.

तसेच सोनं खरेदी करु नका, तेल खाऊ नका असं लोकांना सांगणारं स्वातंत्र्यानंतरचं पहिलं सरकार अशी ‘दैदिप्यमान’ कामगिरी या सरकारने केलीय. ‘अच्छे दिन’च्या नावाखाली सत्तेत आलेल्या या सरकारने देशभरातील झुरळांची अशा प्रकारे जिरवण्याचं काम सुरु केलंय.

असे असताना त्रस्त झुरळं आता संघटीत होत असून सरकारसाठी ही धोक्याची घंटा आहे. अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे येणाऱ्या काळात पेट्रोल डिझेलच्या दर वाढीमुळे राज्यात अजून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.