पुण्यात चोरट्यांचा सुळसुळाट… ग्राहक बनून आलेल्या महिलांकडून सोन्याच्या दुकानात धाडसी चोरी; हजारोंचा ऐवज लंपास


पुणे : सोन्याच्या दरात सतत वाढ होत असल्याने चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशाच एका घटनेत भोर तालुक्यातील नसरापूर बाजारपेठेत ज्वेलरी दुकानात 84 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले आहेत.

नसरापूर मुख्य बाजारपेठेतील पंडित ज्वेलर्स या दुकानात 13 तारखेला सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान ही घटना घडली. गर्दीचा फायदा घेत पाच महिला आणि एक लहान मुलगा ग्राहक असल्याचा बहाणा करून दुकानात आले.

सुरुवातीला काही महिलांनी दागिने पाहण्यास सुरुवात केली आणि नंतर आणखी काहीजण दुकानात दाखल झाले, त्यामुळे कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित झाले. नाकातील नथनी पाहण्याच्या बहाण्याने महिलांनी दागिन्यांची पाऊचेस हातात घेतली. याच दरम्यान अत्यंत शिताफीने एका पाऊचचा हाताळणी करत तो एका लहान मुलाच्या माध्यमातून पुढे देण्यात आला.

काही क्षणांतच हा प्रकार घडून संबंधित व्यक्ती दुकानातून निघून गेल्या. दुकानदारांना सुरुवातीला संशय आला नाही, मात्र नंतर तपासणीदरम्यान दोन पाऊच गायब असल्याचे लक्षात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला.

या घटनेत सुमारे 6 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले असून त्याची किंमत 84 हजार 600 रुपये असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर नसरापूर बाजारपेठेत व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!