पुणेकरांनो, छत्री सोडू नका! पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा..


पुणे : प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानाने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात उन्हाचा चटका वाढला असताना आता हवामान खात्याने पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या पावसामुळे तापमानात काही प्रमाणात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस पुणे आणि परिसरात ढगाळ वातावरण कायम राहणार असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळू शकतात.

रविवारी शहराचे कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सोमवारीही तापमान जवळपास याच पातळीवर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे उष्णतेच्या तीव्रतेत काहीशी घट जाणवू शकते.

सध्या पुणेकरांना दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी ढगाळ हवामानाचा अनुभव येत आहे. हवामान खात्याने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला असून, बाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पाकिस्तान आणि बलूचिस्तानच्या भागातून मध्य भारताकडे अत्यंत उष्ण आणि कोरडे वारे वाहत असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!