राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाढत्या वादावर सुनेत्रा पवार सक्रिय; मोठा निर्णय लवकरच?


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा अंतर्गत नाराजीची चर्चा रंगली आहे. पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमुळे काही वरिष्ठ नेते नाराज असल्याचं समोर येत आहे. निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या पत्रात अनेक नेत्यांच्या नावांसमोर पदांचा उल्लेख नसल्याने पक्षात विसंवाद वाढल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख नव्हता. तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावासमोर स्पष्टपणे पद नमूद करण्यात आलं होतं. त्यामुळे तटकरेंमध्ये नाराजी असल्याच्या चर्चांना उधाण आलं.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांनाही पक्षात डावललं जात असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतल्याचं तटकरेंकडून सांगण्यात आलं.

यानंतर शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचं कौतुक करत, क्षमता असलेल्या नेत्यांचा योग्य वापर करणं हे सध्याच्या नेतृत्वाचं काम आहे, असं वक्तव्य केलं. पक्षातील वाढत्या मतभेदांच्या चर्चेनंतर आता सुनेत्रा पवार सक्रीय झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं समजत असून, लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!