मुलांना भेटण्याच्या बहाण्याने जावयाला बोलावलं; पुण्यात सासरच्यांनी निर्जनस्थळी नेऊन केलं धक्कादायक कृत्य..

पुणे : कौटुंबिक वादातून कोथरूड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी आणि मुलांपासून वेगळं राहत असलेल्या एका वडिलांना मुलांना भेटण्याचं आमिष दाखवून सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कोथरूड पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

किष्किंधानगर, कोथरूड येथे राहणारे नारायण पांडुरंग जानकर (वय ४८) हे पत्नी आणि मुलांपासून वेगळे राहत आहेत. अनेक दिवस मुलांची भेट न झाल्याने त्यांनी आपल्या मेहुण्याशी संपर्क साधत मुलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्यानुसार त्यांना कर्वे रस्ता परिसरात बोलावण्यात आले. नारायण जानकर तेथे पोहोचताच त्यांची पत्नी मयुरी जानकर आणि इतर नातेवाईक आधीपासूनच दबा धरून बसले होते.

सुरुवातीला त्यांना कर्वे रस्त्यावर मारहाण करण्यात आली. त्यानंतर “मुलांना भेटायला नेतो” असे सांगून आरोपींनी त्यांना रिक्षामध्ये बसवले आणि सुतारदरा येथील मोकळ्या मैदानात नेले. तेथे सहा जणांनी मिळून दगड आणि बांबूने त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणीत नारायण जानकर गंभीर जखमी झाले असून त्यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पत्नी मयुरी जानकर, मेव्हणे सुरेश आणि महेश बावदाने यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. कौटुंबिक वादातून एका वडिलांना मुलांना भेटण्यापासून रोखण्यासाठी करण्यात आलेल्या या हिंसक प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.