देशभर गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; लातूरचे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…

नवी दिल्ली : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात आता मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने लातूरमधील प्रसिद्ध RCC कोचिंग क्लासचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रासह वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

लातूर हे ‘लातूर पॅटर्न’मुळे देशभर प्रसिद्ध असून NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. अशातच पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या तपासाकडे लागले आहे.
सीबीआयच्या तब्बल 28 अधिकाऱ्यांच्या पथकाने लातूरमध्ये दाखल होत मोटेगावकर यांची तब्बल 8 ते 10 तास कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्याने अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतूनच शिवराज मोटेगावकर यांचे नाव समोर आल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर सीबीआयने लातूरमध्ये मोठी कारवाई करत चौकशीचा फास अधिक घट्ट केला.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक आरोप समोर आला आहे. मोटेगावकर यांच्या संस्थेने घेतलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न हे NEET च्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आल्याचा आरोप एका पालकाने केला आहे.
याच तक्रारीच्या आधारे तपासाला वेग मिळाल्याचे सांगितले जात आहे. आता सीबीआयकडून मोटेगावकर यांना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत असून, पुढील चौकशीत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.