“सिल्व्हर ओक’वरची ती बंद दाराआड बैठक; नाराज प्रफुल पटेलांनी मांडली खदखद, पण शरद पवार शांतच!


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुशीने आता थेट ‘सिल्व्हर ओक’चे दरवाजे ठोठावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षातील पदांवरून सुरू झालेल्या वादानंतर नाराज झालेल्या प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली, मात्र मोठ्या अपेक्षेने गेलेल्या पटेलांना या भेटीत कोणताही ठोस दिलासा मिळाला नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

१२ मे रोजी रात्री मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’वर ही महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, प्रफुल पटेल यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही अचानक बैठकीला पोहोचल्याने राजकीय चर्चांना अधिकच उधाण आले. सूत्रांच्या माहितीनुसार, तटकरे बैठकीला येणार असल्याची कल्पना अगोदर शरद पवारांनाही नव्हती.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटात राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पत्रावरून मोठा गोंधळ सुरू आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पत्रात प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे होती; मात्र त्यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने पक्षात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. प्रफुल पटेल हे पक्षाचे कार्याध्यक्ष, तर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांची पदे गायब झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

याच पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत प्रफुल पटेल यांनी पक्षातील निर्णयप्रक्रिया, वाढती हस्तक्षेपाची शैली आणि विशेषतः पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पटेल यांनी काही निर्णयांमध्ये ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याची खंत शरद पवारांसमोर मांडली.

बैठक जवळपास १५ ते २० मिनिटे चालली. मात्र या संपूर्ण चर्चेदरम्यान सुनील तटकरे जवळपास शांतच होते. चर्चेचा केंद्रबिंदू प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्यातील संवाद हाच राहिला. महत्त्वाचे म्हणजे, पटेल यांनी मांडलेल्या नाराजीवर शरद पवार यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यांनी केवळ सर्व मुद्दे शांतपणे ऐकून घेतले आणि कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय वर्तुळात या भेटीकडे अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी म्हणून पाहिले जात आहे. अजित पवार गटातील वाढती अस्वस्थता, पदांवरील संभ्रम, पार्थ पवार यांची वाढती सक्रियता आणि ज्येष्ठ नेत्यांची नाराजी या सगळ्या घडामोडींमुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा अंतर्गत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या बैठकीनंतर राष्ट्रवादीत सुरू असलेल्या ‘इनसाईड पॉलिटिक्स’ला अधिक खतपाणी मिळाले असून आगामी काळात अजित पवार गटात आणखी मोठे राजकीय बदल होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून वर्तवली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!