“७ लाखांचे उपचार परवडले नाहीत… म्हणून हॉस्पिटललाच घाबरवलं!”; YouTube बघून ४०० रुपयांत बाँब बनवून हॉस्पिटलला घाबरवण्याचा हडपसरमध्ये थरार

पुणे : “माझ्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते… म्हणून हॉस्पिटललाच घाबरवायचं ठरवलं!” — पुण्यातील हडपसरमध्ये उषाकिरण हॉस्पिटलमध्ये सापडलेल्या बाँबसदृश वस्तूप्रकरणी आरोपी शिवाजी राठोडने पोलिस चौकशीत दिलेली ही कबुली ऐकून तपास यंत्रणाही हादरल्या आहेत. अवघ्या ४०० रुपयांत साहित्य गोळा करून YouTube वर व्हिडीओ पाहत आयईडीसदृश वस्तू तयार करण्यात आल्याचे उघड झाल्याने शहरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

१३ मेच्या रात्री कमधेनू इस्टेट परिसरातील उषाकिरण हॉस्पिटलच्या ICU विभागाजवळील वॉशबेसिनखाली टायमर, वायर आणि जिलेटिनसदृश साहित्य असलेली संशयास्पद वस्तू आढळली होती. घटनेची माहिती मिळताच बाँबशोधक व नाशक पथक, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत परिसर रिकामा केला. पथकाने तत्परतेने कारवाई करत वस्तू निष्क्रिय केली आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी काही दिवसांपूर्वी गुप्तरोगाच्या उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. डॉक्टरांनी उपचारासाठी सुमारे सात लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितल्याचा दावा त्याने केला. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने एवढी मोठी रक्कम उभी करणे शक्य नसल्याने हॉस्पिटल प्रशासनाला धमकावून दबाव निर्माण करण्याचा त्याचा हेतू होता.

पोलिस चौकशीत आरोपीने कबूल केले की, त्याने ऑनलाइन आणि स्थानिक बाजारातून टाइमर घड्याळ, पाईप, वायर, चिकट टेप आणि इतर साहित्य खरेदी केले. त्यानंतर YouTube वर बाँबसदृश वस्तू तयार करण्याचे व्हिडीओ पाहून दोन वायर जोडत संपूर्ण यंत्रणा तयार केली. विशेष म्हणजे, या सर्वासाठी त्याने अवघे ४०० रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी दाढी केली, कपडे बदलले आणि वेगवेगळ्या भागात फिरत राहिला. हॉस्पिटलमध्ये संशयास्पद वस्तू ठेवल्यानंतरही तो परिसरातच फिरत पोलिसांची हालचाल पाहत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. रात्री उशिरापर्यंत तो घटनास्थळाजवळ थांबून बाँबशोधक पथकाची कारवाई पाहत असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.
या प्रकरणात हॉस्पिटलचे डॉक्टर विलास गायकवाड यांच्या धाडसाची विशेष चर्चा होत आहे. रुग्ण आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित असताना त्यांनी प्रसंगावधान राखत संशयास्पद वस्तू सुरक्षितरीत्या बाहेर हलवली. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य जीवितहानी टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, ऑनलाइन व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत धागेदोरे पोहोचवले. टाइमर घड्याळ आणि चिकट टेप खरेदीचे डिजिटल पुरावे तपासासाठी निर्णायक ठरले. आरोपी नागपूरमार्गे पसार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
या घटनेनंतर पुण्यातील खासगी रुग्णालये आणि सार्वजनिक ठिकाणांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. इंटरनेटच्या मदतीने अत्यल्प खर्चात आयईडीसदृश वस्तू तयार होऊ शकते, हे या प्रकरणातून स्पष्ट झाल्याने सुरक्षा यंत्रणांनीही सतर्कतेचा इशारा दिला आहे.