सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीत मांगूर जातीच्या माशाची तस्करी करणार वाहन ताब्यात ; उरुळीकांचन पोलिसांची कारवाई …


उरुळीकांचन: पुणे-सोलापूर महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास वेगाने धावणारी एक संशयित पिकअप गाडी पोलिसांनी अडवली आणि दरवाजा उघडताच आत दिसलेला माल पाहून पोलिसही काही क्षण चक्रावून गेले. गाडीत मोठ्या प्रमाणात बंदी असलेल्या मांगूर जातीच्या माशांची बेकायदेशीर तस्करी सुरू असल्याचे उघड झाल्यानंतर उरुळीकांचन पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालकाविरोधात गंभीर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

ही कारवाई शुक्रवार, (दि.१६) रोजी रात्री ८ वाजून ३२ मिनिटांच्या सुमारास सोरतापवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील म्हसोबा मंदिरासमोर, पुणे-सोलापूर हायवेवर करण्यात आली. पोलिसांनी एमएच/०४/एलक्यू/७६५७ क्रमांकाची पिकअप गाडी ताब्यात घेतली.

या प्रकरणी उरुळीकांचन पोलीस स्टेशनमध्ये दखलपात्र गुन्हा पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५, ३ आणि ५, भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच अन्न सुरक्षा आणि मानके कायदा कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील फिर्यादी तात्याराम अंकुश करे (वय ३४) उरुळीकांचन पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांनी अधिकृत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच/०४/एलक्यू/७६५७ या पिकअप गाडीमधून मांगूर जातीचे मासे बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना आढळून आले. मांगूर जातीच्या माशांच्या वाहतुकीवर बंदी असतानाही आरोपी शासकीय आदेशांचे उल्लंघन करत असल्याचे तपासात समोर आले. तसेच या माशांच्या सेवनामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव असूनही वाहतूक सुरू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणातील आरोपीचे नाव अरषदअली महम्मदअली शेख (वय ३०) असे असून तो भिवंडी, जिल्हा ठाणे येथील संघमित्र नगर परिसरातील रहिवासी आहे. आरोपीचा पत्ता एच. नं. ६७७, जी. एम. हॉस्पिटल शेजारी, संघमित्र नगर, भिवंडी, ठाणे असा आहे.

या प्रकरणातील दाखल अंमलदार म्हणून पोलीस हवालदार शेख (ब. नं. १३४५) यांनी काम पाहिले असून तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार मोरे (ब. नं. ८७४) यांच्याकडे देण्यात आली आहे. उरुळीकांचन पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!