“सोनं स्वस्त झालं!” बातमी वाऱ्यासारखी पसरताच महिलांची दुकानांकडे धाव; चांदी तब्बल ₹20 हजारांनी घसरली


गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्या-चांदीचे दर अचानक कोसळले आणि सराफ बाजारात अक्षरशः ग्राहकांची झुंबड उडाली. “आज नाही घेतलं तर पुन्हा महाग होईल” या भीतीने महिलांनी सकाळपासूनच दागिन्यांच्या दुकानांबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. इराण-अमेरिका संघर्षाचा परिणाम आता थेट भारतीय बाजारावर दिसू लागला असून, केवळ 24 तासांत सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 20 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीत आज सकाळपासूनच सराफ बाजारात मोठी लगबग पाहायला मिळाली. जीएसटीसह सोन्याचा दर 1 लाख 62 हजार 225 रुपयांवर आला असून, चांदीचा दर 2 लाख 73 हजार 980 रुपयांवर पोहोचला आहे. दोन दिवसांपूर्वी वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांनी खरेदी थांबवली होती. मात्र, दर घसरताच नागरिकांनी पुन्हा दुकानांकडे मोर्चा वळवला.

सराफ व्यावसायिकांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या इराण-अमेरिका तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. त्यानंतर गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीऐवजी तेल क्षेत्राकडे अधिक लक्ष दिले. परिणामी, मौल्यवान धातूंमधील गुंतवणूक कमी झाली आणि दर घसरले. पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतींचाही अप्रत्यक्ष परिणाम सराफ बाजारावर झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी चलनावरील दबाव कमी ठेवण्यासाठी नागरिकांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, दर कमी होताच ग्राहकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष करत मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली. “दर कमी झाले म्हणून लगेच आलो”, “सोनं पुन्हा महाग होण्याआधी खरेदी करून ठेवतोय”, अशा प्रतिक्रिया ग्राहकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

व्यावसायिकांच्या मते, पुढील काही काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार होऊ शकतात. मात्र, सध्याची घसरण पाहता ग्राहकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे. त्यामुळे जळगावसह अनेक शहरांतील सराफ बाजार पुन्हा एकदा ग्राहकांनी गजबजून गेले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!