“महाराष्ट्राच्या वैद्यकीय जागांवर डल्ला?”; राज ठाकरे संतापले, केंद्राच्या भूमिकेवर थेट हल्ला

मुंबई : “उत्तरेतील विद्यार्थी दक्षिणेत आणि महाराष्ट्रात घुसवण्यासाठीच या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा सगळा खेळ सुरू आहे,” असा खळबळजनक आरोप करत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा वैद्यकीय प्रवेश परीक्षेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रश्नपत्रिका फुटीचं प्रकरण, शिकवणी वर्गांचं वाढतं जाळं आणि मराठी विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय यावर बोलताना त्यांनी केंद्र सरकारसह महाराष्ट्र सरकारलाही थेट लक्ष्य केलं.

“या प्रवेश परीक्षा वगैरे काही नकोत आपल्याला. आपल्याला आपल्या राज्यातील मुलांशी घेणंदेणं आहे. महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मराठी मुलांनाच प्रवेश मिळणार नसेल तर उपयोग काय?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील सामान्य आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या व्यवस्थेत जाणीवपूर्वक मागे ढकललं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रश्नपत्रिका फुटीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, “दहा लाख रुपयांना प्रश्नपत्रिका विकल्या जात आहेत. शिकवणी वर्ग आणि पैशांच्या जोरावर परीक्षा वाकवल्या जात आहेत. ज्याच्याकडे पैसा आणि ओळखी आहेत, त्याच्यासाठीच ही व्यवस्था उरली आहे.” लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेल्या खेळावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

२०१६ मध्ये ही प्रवेश परीक्षा लागू करण्यालाच आपण विरोध केला होता, असं सांगताना त्यांनी केंद्राच्या ‘एक देश, एक परीक्षा’ धोरणावर हल्लाबोल केला. “पूर्वी प्रत्येक राज्याची स्वतंत्र परीक्षा होती. त्यात सुधारणा करायला हव्या होत्या. पण सगळं केंद्रीकृत करण्याच्या हट्टातून विद्यार्थ्यांचं नुकसान झालं,” असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेचं समर्थन करत महाराष्ट्र सरकारलाही टोला लगावला. “दक्षिणेतील राज्यं आवाज उठवत आहेत. महाराष्ट्रानेही पाठीचा कणा ताठ ठेवून आपल्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी उभं राहायला हवं,” असं त्यांनी म्हटलं.
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले, “इतके घोळ होऊनही जबाबदारी निश्चित होत नाही. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.”