देशात आर्थिक आणीबाणी येणार का? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण..

नवी दिल्ली : जागतिक तणाव आणि वाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलची बचत करण्याचे आवाहन केले आहे. इंधनावरील वाढता खर्च आणि परकीय चलनाचा ताण लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाची सर्वांनी गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. परिस्थिती गंभीर असल्याने देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली जावी आणि त्या बैठकीला स्वतः पंतप्रधान उपस्थित राहावेत.
ते पुढे म्हणाले की, याआधी अनेक विषयांवर सर्वपक्षीय बैठका झाल्या, मात्र त्यामध्ये पंतप्रधान उपस्थित नव्हते. कधी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तर कधी इतर मंत्री बैठकीला उपस्थित असायचे. पण देशासमोरील परिस्थिती किती गंभीर आहे हे स्वतः पंतप्रधान सांगत असतील, तर त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होणं आवश्यक आहे.

दरम्यान, काही नेते दुचाकी किंवा पायी प्रवास करत असल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, हे फक्त एक-दोन दिवसांसाठी असेल तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. ज्या नेत्यांनी ताफे कमी केले आहेत त्यांनी त्यात सातत्य ठेवायला हवं. फक्त देखावा म्हणून हे करू नये.

मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.